बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती शहरात ‘चड्डी गँग’ने धुमाकूळ घातला असून एका सराफी दुकानावर दरोडा टाकून १२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. आठ जणांच्या या टोळीने ‘कालिका ज्वेलर्स’ला लक्ष केले असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

सवदत्ती शहरातील रामापूर साईट जवळील कत्राळ इमारतीत असलेल्या कालिका ज्वेलर्समध्ये हा धाडसी दरोडा पडला आहे. हे दुकान सुरेश बडिगेर यांच्या मालकीचे असून चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे १२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीची ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच सवदत्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आठ जणांची टोळी चोरी करताना स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तपास यंत्रणा वेगाने फिरवली असून आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.
शहरात चड्डी गँग सक्रिय झाल्याने स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली असून संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. या प्रकरणी सवदत्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments