“विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबतच राष्ट्रप्रेम रुजवल्यास खऱ्या अर्थाने शिक्षणाचे सार्थक होते. संत मीरा शाळेच्या शिक्षण पद्धतीत भारतीयत्व, संस्कृती आणि कलांचा सुरेख संगम पाहायला मिळतो,” असे प्रतिपादन शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालिका लीलावती हिरेमठ यांनी केले.


अनगोळ येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “शिक्षण संस्थांनी मुलांच्या केवळ अभ्यासावरच भर न देता त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. संत मीरा शाळा या दिशेने उत्तम कार्य करत आहे. ही संस्था शिक्षणाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत नाही. शिक्षण विभागासोबतही या शाळेचा चांगला समन्वय असून आजवर या शाळेबद्दल कोणतीही तक्रार आलेली नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रसिद्ध उद्योजक श्रीधर उप्पीन म्हणाले की, “राष्ट्राचे भविष्य मुलांमध्ये दडलेले आहे. त्यांना उत्तम संस्कार आणि शिक्षण दिल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. संत मीरा शाळा हेच पवित्र कार्य करत आहे.”
कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर वाणी जोशी यांच्या हस्ते झाले. शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांनी स्वागत केले, तर प्राचार्य सुजाता दप्तरदार यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाटक आणि देशभक्तीपर गीतांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी आर.के. कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments