Belagavi

डॉ. महांतेश रामण्णवर यांना मानाचा ‘आयुर्वेद विश्वरत्न’ पुरस्कार जाहीर

Share

बेंगळुरू येथील पॅलेस मैदानावर आयोजित दुसऱ्या ‘विश्व आयुर्वेद संमेलनात’ बेळगावचे प्रसिद्ध डॉक्टर आणि देहदान चळवळीचे दूत डॉ. महांतेश रामण्णवर यांना प्रतिष्ठित ‘आयुर्वेद विश्वरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कजे आयुर्वेदिक फाउंडेशनच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

केएलई बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयातील शरीर रचना विभागाचे प्रमुख आणि डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव असलेल्या डॉ. महांतेश रामण्णवर यांनी वैद्यकीय इतिहासात एक क्रांतिकारी पाऊल उचलले होते. देहदानाबद्दल समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे विच्छेदन करून वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आदर्श घालून दिला होता. त्यांच्या याच धाडसी आणि निस्वार्थी कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

देश-विदेशातील एकूण ४०० निवडक आयुर्वेदिक डॉक्टरांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून, त्यात डॉ. रामण्णवर यांचा समावेश असणे ही बेळगावसाठी अभिमानाची बाब आहे. देशभर देहदान आणि अवयवदान मोहिमेद्वारे लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.

या यशाबद्दल विश्व आयुर्वेद संमेलनाचे आयोजक डॉ. गिरीधर कजे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास कुमार शेट्टी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: