उत्तर कर्नाटक आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात राज्य काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याविरोधात ८ डिसेंबर रोजी आंदोलन केले जाईल, अशी माहिती विधान परिषद सदस्य एन. रविकुमार यांनी दिली.
ते बुधवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, मका, मूग, उडीद, तूर आणि कापूस यासाठी खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सोडवावी आणि रायचूर, बल्लारी, कोप्पळ येथील जनतेसाठी उपयुक्त असलेले तुंगभद्रा नदीचे पाणी आंध्र प्रदेशला सोडण्याचा निर्णय त्वरित थांबवावा, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेतकऱ्यांना प्रति एकर २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. “राज्य सरकार जेवणाच्या मीटिंगमध्ये व्यस्त आहे.” काँग्रेस हाय कमांडने खूप संशोधनानंतर नाश्त्यातून समस्यांवर तोडगा काढला आहे, अशा शब्दांत त्यांनी टीकाहि केली. मक्याच्या खरेदीसाठी शेतकरी आंदोलन करत असतानाही सरकारने दुर्लक्ष केले आहे. लाखो टन उडीद पीक तयार झाले आहे, पण अद्याप खरेदी केंद्रे सुरू केलेली नाहीत असेही ते म्हणाले.
आमदार भालचंद्र जारकीहोळी बोलताना म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली ९ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांसह सुवर्ण विधानसौधसमोर धरणे आंदोलन केले जाईल अशी माहिती देत दुधाचे प्रोत्साहन अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी पी. राजीव म्हणाले की, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आणि उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. “२० हजारहून अधिक शेतकऱ्यांसह भाजप पादयात्रा काढून सरकारला धडा शिकवेल.” सरकार शेतकऱ्यांचा फक्त ५ क्विंटल मका खरेदी करणार असल्याचे सांगते. यामुळे शेतकऱ्यांचा कोणताही फायदा होणार नाही. सदनाच्या बाहेर आणि आतही जोरदार आंदोलन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला बेळगाव ग्रामीण जिल्हा युनिटचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आणि शहर युनिटच्या अध्यक्षा गीता सुतार आदींसह भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments