बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्कोडीला स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी ‘चिक्कोडी जिल्हा कृती समिती’च्या नेतृत्वाखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रमुख आणि २५ हून अधिक स्वामीजी या बैठकीत सहभागी झाले होते आणि त्यांनी स्वतंत्र जिल्ह्याच्या निर्मितीबद्दल आपले मत मांडले.
निडसोसीचे पंचमशिवलिंगेश्वर स्वामीजी यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवून बोलताना सांगितले की, चिक्कोडी स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती ही अनेक वर्षांपासून जनतेची प्रबळ अपेक्षा आहे. “शासनाने यात आणखी विलंब न करता त्वरित घोषणा करावी,” असे त्यांनी आग्रहाने सांगितले.
जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष एस. वाय. हंजी यांनी बोलताना सांगितले की, अखंड कर्नाटकच्या निर्मितीमध्ये उत्तर कर्नाटकातील राजांचे मोठे योगदान आहे. मात्र, “आजच्या विकास वाटपात उत्तर कर्नाटकावर अन्याय होत आहे.” चिक्कोडी जिल्हा निर्मितीसंदर्भात जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना भेटून आम्ही निवेदन सादर केले आहे. “सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली आहे,” असे त्यांनी म्हटले.
या बैठकीत चिक्कोडीचे संपादना स्वामीजी, जोडकुऱ्हळीचे चिद्भानंद स्वामीजी, बेल्लद बागेवाडीचे शिवानंद स्वामीजी, बेंडवाडचे गुरुसिद्ध स्वामीजी, सिद्धेश्वर स्वामीजी, शरणबसव देवरे, गुरुदेव देवरे, मल्लिकार्जुन स्वामीजी, शिवानंद स्वामीजी, शिवबसव स्वामीजी, रेवणसिद्धेश्वर स्वामीजी, कृती समितीचे नेते रुद्रप्पा संगप्पागोळ, सुरेश बॅकूडे, नागेश माळी, रेवप्पा तळवार, रमेश बस्तवाडे, अजित संगोळ्ळी, खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक रामकृष्ण पानबुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments