kitturu

कित्तूरच्या नाईतेगुर दुर्गादेवी यात्रा महोत्सवाला ८ डिसेंबरपासून प्रारंभ

Share

नाईतेगुर येथील ग्रामदेवता श्री दुर्गादेवीचा वार्षिक यात्रा महोत्सव सोमवार, ८ डिसेंबर ते बुधवार, १० डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्ट कमिटीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाईतेगुर ग्रामच्या दुर्गादेवी यात्रा महोत्सवासाठी ट्रस्ट कमिटीने जय्यत तयारी केली आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र, गोवा यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे ५० ते ६० हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वर्षी कित्तूरचे पी.एस.आय. प्रवीण गंगोळ यांच्या हस्ते यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने तीन दिवस विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, ८ डिसेंबर रोजी सिद्धलिंगेश्वर देवाचा अभिषेक, मंगळवार, ९ डिसेंबर रोजी वीरभद्रेश्वर देवाचा अभिषेक, तर बुधवार, १० डिसेंबर रोजी दुर्गादेवीचा अभिषेक, ओटी भरण्याचा कार्यक्रम, दुपारी एक वाजता पालखी उत्सव, करियम्मा देवीचा अभिषेक आणि महापूजा कार्यक्रम होणार आहेत. याव्यतिरिक्त, लहान मुलांचे तुळाभार कार्यक्रम, मान्यवरांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष सुभास ह. द्यन्नवर यांनी यावेळी सांगितले की, वर्षभर प्रत्येक अमावस्येला आणि विशेष दिवशी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने याठिकाणी भाविक दाखल होतात.

याप्रसंगी विविध राजकीय मान्यवर, आमदार, मठाधीश आणि कलावंत उपस्थित राहणार असून, सर्व भाविकांनी शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ट्रस्ट कमिटीचे सचिव संभाजी हिरकी, रामचंद शिंदे, शंकर बेटगार, बसवराज बेटगार, शिक्षक शंकर बडीगेर, मौनेश हिरकी, शंकर पागद, तम्मण्णा पागद, गोविंद पत्तार, कल्मेश पागद, शंकर नावलगी, बसवराज बंगी आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: