काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनीच पुढे चालू राहावे, अन्यथा सरकार कोसळेल, असे मोठे राजकीय भाकीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार जगदीश शेट्टर यांनी केले आहे. ते हुबळी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शेट्टर यांनी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवर टीका करताना म्हटले की, एका बाजूला ऊस दरासाठी बैठक बोलावली जाते आणि दुसरीकडे राजण्णा यांच्या निवासस्थानी राजकीय मेजवानीचे आयोजन केले जाते. शेतकऱ्यांची आणि साखर कारखानदारांची बैठक केवळ अर्धा तास चालवणे शक्य आहे का? राजण्णा यांनी बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, हे आधीच कळवायला हवे होते. त्याऐवजी शेवटच्या क्षणी मेजवानी रद्द करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. ‘नव्हेंबर क्रांती’बद्दल भाजप नेत्यांनी नव्हे, तर काल मेजवानीचे आयोजन करणाऱ्यांनीच चर्चा सुरू केली. क्रांती होईल की भ्रांती, हे माहीत नाही, पण काहीतरी नक्कीच घडणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस कर्नाटकात राजकीय बदल होण्याची शक्यता आहे, असे भाकीत त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे समर्थक तेच पुढील मुख्यमंत्री होतील, अशा मानसिकतेत आहेत. सिद्धरामय्या हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे डीके शिवकुमार यांनी जाहीरपणे सांगावे. जर त्यांनी तसे सांगितले नाही, तर नेतृत्वातील बदलाचे काम आतून सुरू आहे, असा त्याचा अर्थ होतो. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर सरकारचे पतन होणे निश्चित आहे, असा इशारा शेट्टर यांनी दिला.


Recent Comments