बेळगाव डीसीसी बँक निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, कित्तूर तालुक्यातील भाजप गटात तीव्र असंतोष उफाळून आला आहे. येत्या २८ ऑक्टोबर रोजी कित्तूर तालुका डीसीसी बँक निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असला तरी, त्यापूर्वीच भाजप कार्यकर्ते बसवराज परवन्नवर यांनी उमेदवार विक्रम इनामदार यांच्या पराभवाला माजी आमदार महांतेश दोडगौडर हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पुढील विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्याची स्पर्धा असल्याने, दोडगौडर यांनी इनामदार यांना मुद्दाम हरवले, असा आरोप बसवराज परवन्नवर यांनी एका व्हिडिओ विधानाद्वारे केला आहे. या आरोपाला उत्तर देताना विक्रम इनामदार आणि महांतेश दोडगौडर यांनी, बसवराज परवन्नवर यांनीच विक्रम इनामदार यांच्या विरोधात क्रॉस व्होटिंग केले असल्याचा उलट आरोप केला आहे.
विक्रम इनामदार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपण कोणाच्याही दबावाखाली निवडणूक लढवली नाही. डॉ. बसवराज परवन्नवर यांनीच आपल्या विरोधात क्रॉस व्होटिंग केले आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. हा माझा पराभव नसून विश्वासघात आहे. आगामी काळात आम्ही सर्वजण एकत्रितपणे या परिस्थितीचा सामना करू, असे त्यांनी म्हटले आहे.
तर, डॉ. बसवराज परवन्नवर यांनी आपल्या आरोपावर ठाम राहत, विक्रम इनामदार यांच्या पराभवाला माजी आमदार महांतेश दोडगौडर हेच जबाबदार असल्याचा आरोप केला.
यावर महांतेश दोडगौडर यांनी, डॉ. बसवराज परवन्नवर यांनीच क्रॉस व्होटिंग करून, आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारण्याचे काम केले आहे, असा आरोप केला.


Recent Comments