






वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांनी ब्रिटिशांविरुद्ध विजय मिळवलेला २३ ऑक्टोबर हा दिवस ‘स्वाभिमान दिन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली.

गुरुवारी रात्री कित्तूर उत्सवाच्या उद्घाटन समारंभात राणी चन्नम्मा मंचावर ते बोलत होते. गांधी जयंती ‘विश्व अहिंसा दिन’ म्हणून, अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याच धर्तीवर कित्तूर विजयोत्सव दिवस केंद्र सरकारने ‘स्वाभिमान दिन’ म्हणून घोषित करावा, असे त्यांनी म्हटले. कित्तूर आणि बैलाहोंगलचा परिसर राणी चन्नम्माची कर्मभूमी म्हणून ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
बैलूर निष्कल मठाचे श्री निजगुणांद स्वामीजी यांनी आपल्या भाषणात, १२ व्या शतकात अक्कमहादेवींना ‘कन्नडच्या पहिल्या कवयित्री’चे स्थान देऊन धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्यात आले. बसवण्णा यांच्या संकल्पनेतून हा संघर्ष झाला आणि स्वातंत्र्याचा बिगुल वाजला, असे मत व्यक्त केले.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, कित्तूर वीरांगणा राणी चन्नम्मा यांचा इतिहास, त्यांचा संघर्ष आणि त्याचे स्मरण या कित्तूर उत्सवात होते. उत्सवाबरोबरच या भागाचा विकास करणे हा आमच्या सरकारचा संकल्प आहे. कित्तूरच्या विकासासाठी सरकारने उत्सवासह अधिक निधी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी ५ कोटी रुपये दिले जातात आणि यावर्षीही ५ कोटी रुपये देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी, देशात कित्तूरप्रमाणेच राष्ट्राभिमान वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. लोकशाही व्यवस्थेत त्या-त्या सरकारांकडून विकास साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. १८२४ च्या युद्धाचा इतिहास सर्वांना माहीत असायला हवा आणि त्याचे स्मरण केले पाहिजे. ब्रिटिश अधिकाऱ्याला तुरुंगात टाकून त्यांच्याविरुद्ध लढत स्वातंत्र्याचा बिगुल वाजवण्याचे श्रेय कित्तूर वीरांगणा राणी चन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी अब्बक्कादेवी आणि चन्नभैरवी देवी यांना जाते, असे त्यांनी नमूद केले.
कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, राणी चन्नम्मा यांच्या खुणा जपून, त्यांचा इतिहास आणि देशप्रेम तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. कित्तूर ही ऐतिहासिक भूमी आहे. तिचा विकास करून पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरकारच्या अनुदानाचा योग्य वापर करून विकासकामे केली जात आहेत. हा केवळ कित्तूर उत्सव नसून या भागातील एक यात्रा आहे, असे त्यांनी सांगितले.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी, इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांना मिळालेले स्थान राणी चन्नम्मा यांना मिळालेले नाही. त्यामुळे चन्नम्माच्या इतिहासावर अधिक संशोधन व्हायला हवे. महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा या उद्देशाने असे उत्सव साजरे केले जातात. राज्य सरकारने यंदा ५ कोटी रुपये देऊन चन्नम्मा उत्सव अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यासाठी पाऊल उचलले आहे, असे त्यांनी म्हटले.
विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी यांनी, कित्तूरला राष्ट्रीय स्मारक करण्याचा आग्रह आहे. आपण सर्वांनी मिळून केंद्रावर दबाव आणून ही मागणी पूर्ण करूया, असे आवाहन केले.
या समारंभात चन्नम्मा कित्तूर राजगुरु संस्थान कलीमठचे मडीवाळ राजयोगिंद्र महास्वामी, निच्चणकीचे श्रीगुरू मडीवाळेश्वर मठाचे पंचाक्षरी महास्वामी आणि बसवानंद महास्वामी उपस्थित होते. जिल्हाधिकारी महम्मद रोशन, पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी, भरमण्णा उप्पार, जयसिद्राम मारीहाळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


Recent Comments