बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती शहरात प्रेमविवाहानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

काशीम्मा नेल्लीकट्टी असे मृत महिलेचे नाव असून ती बस कंडक्टर म्हणून कार्यरत होती. पती-पत्नीमधील वाद, चारित्र्यावर संशय आणि शारीरिक छळ यातून हे टोकाचे कृत्य घडले. घटस्फोटानंतर केवळ १२ दिवसांनी पतीने ही क्रूर हत्या केली असून, खून करून आरोपी पोलीस कर्मचारी संतोष कांबळे फरार झाला आहे. सवदत्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे.
. काशीम्मा आणि पोलीस शिपाई संतोष यांनी सुमारे १३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर पत्नीवर संशय घेऊन संतोषकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. पत्नीला सतत त्रास देणे आणि मारहाण करण्याच्या जाचाला कंटाळून काशीम्मा पतीपासून विभक्त झाली. यानंतर ती माहेरी वास्तव्यास होती. यानंतर तिने आपली बदली सवदत्ती डेपो येथे करून घेतली होती. तसेच, दोघांनी बैलहोंगल न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
माहेर सोडून काशीम्मा सवदत्ती शहरात भाड्याच्या खोलीत राहत होती आणि तिने ५ एप्रिल २०२५ रोजी न्यायालयाकडून घटस्फोटही मिळवला होता. घटस्फोटानंतरही संतोष तिला फोन करून शिवीगाळ करत होता व त्रास देत होता. अखेर १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता संतोष काशीम्माच्या घरी गेला आणि त्याने तिच्यासोबत जोरदार वाद घातला. या वादामध्ये क्रूर पतीने पत्नीचा गळा चिरला, तसेच पोटात चाकूने भोसकून तिच्यावर तीन वेळा वार केले आणि तिची हत्या करून तो तेथून पसार झाला. तीन दिवसांनंतर खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
याबाबत मृत महिलेचा भाऊ मंजुनाथ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “त्यांचा प्रेमविवाह होऊन १० वर्षे झाली होती. पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत होती, यावरून न्यायालयात दावाही सुरू होता. यापूर्वीही बसमध्ये भांडण होऊन आपल्या बहिणीला मारहाण झाली होती. मात्र, यावेळी चाकूने हल्ला करून तिला संपवण्यात आले. आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्याने केली.
याचप्रमाणे दुसरा भाऊ ईरन्ना यांनी माहिती देताना सांगितले कि, आपल्या बहिणीच्या पतीला व्यसने होती. दोन वर्षांपूर्वी दोघंही विभक्त झाले होते. मात्र त्यानंतरदेखील सातत्याने तिचा पती तिला त्रास द्यायचा. अखेर त्याने तिचा खून करून दरवाजाला कुलूप लावून तो फरारी झाला आहे. मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणी सवदत्ती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. फरार आरोपी संतोष कांबळे याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असून, कसून तपासणी सुरू आहे.


Recent Comments