
जगप्रसिद्ध ‘म्हैसूर दसरा महोत्सवा’चे यंदाचे उद्घाटन बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते करण्यात आले. यावर बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
‘बानू मुश्ताक यांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला असेल, पण त्या माणूस आहेत. धर्माच्या आधारावर माणसाने द्वेष करू नये. जर कोणी धर्मावरून द्वेष करत असेल, तर ते माणुसकीचे लक्षण नाही,’ असे ते म्हणाले.
आज सकाळी चामुंडी टेकडीवरील चांदीच्या रथात विराजमान असलेल्या चामुंडेश्वरी देवीची विशेष पूजा करण्यात आली. यावेळी बानू मुश्ताक यांच्या हस्ते देवीला पुष्प अर्पण करून दसरा महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. त्याआधी, लेखिका बानू मुश्ताक, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर मान्यवरांनी चामुंडी देवीच्या मंदिराला भेट दिली. गणपतीची पूजा केल्यानंतर त्यांनी चामुंडेश्वरी देवीचे दर्शन घेतले. यावेळी बानू मुश्ताक यांनी मंगलारती स्वीकारली. मंदिर प्रशासनाने त्यांना फुलांचा हार आणि रेशमी साडी भेट दिली. गर्भगृहासमोर बानू मुश्ताक यांनी चामुंडेश्वरी देवीसमोर हात जोडून नमस्कार केला, त्यावेळी त्या खूप भावूक झाल्या होत्या.
यानंतर बोलताना बानू मुश्ताक यांनी सांगितले, ‘मी आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमध्ये पाहुणी म्हणून सहभागी झाले आहे. मी शेकडो वेळा दीपप्रज्वलन केले आहे. अनेक वेळा पुष्पांजली वाहिली आहे आणि मंगलारती देखील स्वीकारली आहे.’ असे त्यांनी म्हटले. ‘पुष्पांजली वाहणे, मंगलारती स्वीकारणे आणि दीपप्रज्वलन करणे माझ्यासाठी नवीन नाही. याबद्दल माझ्या लवकरच प्रकाशित होणाऱ्या आत्मचरित्रात उल्लेख आहे. हिंदू धर्मासोबत माझे संबंध आणि बंध कसे आहेत, हे मी माझ्या आत्मचरित्रात लिहिले आहे.’ असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या भाषणात भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, ‘ज्यांना दसरा आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेची माहिती नाही, त्यांनी बानू मुश्ताक यांना विरोध केला. इतिहास विकृत करणे आणि स्वार्थासाठी राजकारण करणे हा अक्षम्य गुन्हा आहे. राजकारण करायचे असेल तर ते निवडणुकीत करावे. ‘नाडहब्बा’सारख्या उत्सवात खालच्या स्तराचे राजकारण करणे खूपच क्षुल्लक आहे.’ कुवेंपू यांच्या ‘गुडी-चर्च-मशिदीतून बाहेर या, आमचे सर्व धर्म-पंथ हे शांततेचे उद्यान आहे,’ या विचारांचा संदर्भ देत त्यांनी भाजपवर टीका केली.
या सोहळ्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.


Recent Comments