Belagavi

परिवहन कर्मचाऱ्यांचा संप अटळ; मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ

Share

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी ३८ महिन्यांचा थकीत पगार आणि कर्मचारी संघटनेच्या निवडणुकीसह विविध मागण्यांसाठी सोमवार मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. यामुळे राज्यभरातील बस सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना संप एक दिवस पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत.

आज विधानसौध येथील सभागृहात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी परस्पर संवादातून समस्या सोडवता येऊ शकतात, असे सांगितले. तसेच, कर्मचाऱ्यांनी उद्याचा संप मागे घ्यावा, अशी विनंतीही केली. “आम्ही सत्तेत आल्यावर सर्व मंडळांवर एकूण ४,००० कोटी रुपयांचे कर्ज होते. २०१८ मध्ये हे कर्ज केवळ १४ कोटी रुपये होते. सध्या कोणतेही परिवहन मंडळ नफ्यात नाही. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. सर्व मंडळांनी सहकार्य करावे. कर्मचारी संघटनेची निवडणूक घेण्याबाबत विचार केला जाईल. सर्व मागण्या चर्चेतून सोडवण्यासाठी सरकार तयार आहे,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

या बैठकीनंतर कामगार नेते अनंत सुब्बाराव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “३८ महिन्यांच्या थकीत वेतनाच्या मागणीवर आणि १ जानेवारी २०२४ पासून वेतनवाढीच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही स्पष्टता दिली नाही. त्यामुळे आम्ही समाधानी नाही. उद्यापासून (सोमवार) राज्यभरात चारही परिवहन मंडळाचे कर्मचारी संपावर जाण्याचा निर्णय घेत आहोत. आज सरकारने ऐनवेळी आम्हाला चर्चेसाठी बोलावले, पण संप उद्यापासून होणारच.”

सभेनंतर परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “त्यांची ३८ महिन्यांच्या वेतनवाढीची मागणी आहे. श्रीनिवास मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने १ जानेवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंतचा थकीत पगार देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार १४ महिन्यांचा पगार देण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे. परिवहन कर्मचारी संघटनेची निवडणूक घेण्याची त्यांची आणखी एक मागणी आहे. त्यावरही विचार केला जाईल. चर्चेतून सर्व मागण्या सोडवण्यासाठी सरकार तयार आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

या बैठकीत परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव नसर अहमद, मुख्य सचिव शालिनी रजनीश, केएसआरटीसीचे अध्यक्ष एस.आर. श्रीनिवास, एनडब्ल्यूकेएसआरटीसीचे अध्यक्ष राजू कागे यांच्यासह परिवहन कर्मचारी संघटनेचे अनेक नेते उपस्थित होते.

Tags: