Belagavi

पंढरीत फडणवीसांनी केली विठू माऊलीची पूजा

Share

जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल पांडुरंग हरी नामाचा जयघोषात आज पंढरपुरी नगरी दुमदुमली. विठ्ठलनामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत आज पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची महापूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली. राज्याची भरभराट व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.आषाढी एकादशीनिमित्त आज मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली. या पूजेसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. यामुळे मंदिराचे पावित्र्य अधिकच खुलले होते.या वर्षीच्या शासकीय पूजेचा मान सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील शेतकरी दाम्पत्य बाळासाहेब पाटील आणि श्रीमती शोभा पाटील यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Tags: