Uncategorized

समाजात परिवर्तन घडवण्याची जबाबदारी माध्यमांची : राजयोगिनी ब्रह्माकुमारी अंबिका दीदी

Share

बेळगाव – जगात आज सर्वत्र अशांतता पसरली आहे. अशावेळी सर्वांना शांती सदभावनेची गरज असून, समाजात परिवर्तन घडवण्याची जबाबदारी माध्यमांची असल्याचे प्रतिपादन,प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बेळगाव विभाग प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी अंबिका दीदी यांनी बोलताना केले.

अनगोळ येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शांती भवन येथे आज मंगळवारी पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अंबिका दीदी यांच्यासह अनगोळ सेंटरच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी विद्या दीदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी पुढे बोलताना अंबिका दीदी म्हणाल्या,सर्वत्र अराजकता माजली आहे. अशा काळात प्रत्येकाने आपले अवगुण दूर सारणे गरजेचे आहे. प्रत्येकाने भक्तिमार्गाने आपले कर्तव्य पार पाडावे. स्वतःचे अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.यातूनच प्रत्येकाला जीवनात शांती आणि सद्भभावना प्राप्त होईल. यामध्येही प्रामुख्याने समाजात शांतता सद्भभावना आणि एकता वाढविण्याची जबाबदारी पत्रकारांची असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रह्माकुमारी विद्या दीदी म्हणाल्या, आधुनिक तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आले असले तरीही,माणसा माणसातील दुरावा वाढला आहे.आजचे जग माध्यमांवर अवलंबून आहे. माध्यमांचा प्रभाव खूपच वाढला आहे. त्यामुळे माध्यमांची जबाबदारी ही वाढली आहे.पत्रकारांनी समाजात आध्यात्मिक विश्वासाचे वातावरण निर्माण करावे.यातून समाजात शांती सद्भभावना निर्माण होईल. असेही त्यांनी स्पष्ट केले.भारती श्रमजीवी पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत काकतीकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी यावेळी समयोचीत विचार मांडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. शिवानंद भाई यांनी सर्वांचे स्वागत केले. ब्रह्माकुमारी शोभा दीदी यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कार्याचा परिचय करून दिला.ब्रम्हाकुमारी अनिता दीदी यांनी राजयोगाची माहिती दिली.ब्रम्हाकुमारी रूपा दीदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.ब्रम्हाकुमार दत्तात्रय भाई यांनी आभार मानले,ब्रम्हाकुमार श्रीकांत भाई यांच्यासह बहुसंख्य सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.

Tags: