Belagavi

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट

Share

हुक्केरी तालुक्यातील इंगळगी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण केल्याच्या प्रकरणात मोठे वळण आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांपैकी एका हिंदू आणि तीन मुस्लिम तरुणांना अटक केली असून, सोशल मीडियावर यासंदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे बेळगावचे एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी स्पष्ट केले.

आज बेळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. हुक्केरी तालुक्यातील इंगाळगी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झाडाला बांधून मारहाण केल्याच्या प्रकरणात, आतापर्यंत चौघांना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. झाडाला बांधून मारहाण करणाऱ्यांमध्ये एक हिंदू आणि तीन मुस्लिम व्यक्ती आहेत, परंतु काही समाजमाध्यमांवर हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने, ‘अल्पसंख्याक समुदायाने हिंदूंवर हल्ला केला’ अशा स्वरूपात सादर करण्यात आले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

पुढे बोलताना एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या घटनेतील कायदेशीर पैलूंवर भर दिला. जर अवैध गोवंश वाहतूक सुरू असेल, तर पोलिसांना माहिती न देता, श्रीराम सेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून केवळ महिला असलेल्या घरात घुसणे कायद्याने चुकीचे आहे. तसेच, ग्रामस्थांनीही कायदा हातात घेणे हा गुन्हा आहे. श्रीराम सेनेच्या पाच कार्यकर्त्यांपैकी एक जण तडीपार गुंड असून, तो यापूर्वीच जिल्ह्यातून हद्दपार झालेला आहे.

समाजासाठी धोकादायक ठरलेले लोक, एखाद्या संघटनेचे नाव वापरून अशा घटनांना प्रोत्साहन देत आहेत. ‘पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही’ हा आरोप पूर्णपणे निराधार असून, घटनेशी संबंधित दोन्ही बाजूंनी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. ज्या संघटना तडीपार झालेल्या गुंडांचे नाव वापरत आहेत, त्यांनी आधी याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कायदा हातात घेणे चुकीचे असून, त्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मात्र, जर कोणी तडीपार गुंडाला पाठिंबा देऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिला.

Tags: