बेळगाव येथील शाहूनगर येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शाहूनगरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र श्रमणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना महिलांनी राखी बांधून मिठाईचे वाटप केले. केवळ भावा-बहिणीच्या नात्यापुरते मर्यादित न राहता समाजाला स्वच्छ ठेवणाऱ्या घटकांशी बांधिलकी जपणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

सफाई कर्मचाऱ्यांची सेवा अनन्यसाधारण असून शहराला स्वच्छ ठेवणारे हे कर्मचारी म्हणजे आपला खरा परिवार आणि ईश्वराचे रूप आहेत, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख कृष्ण भट यांनी केले. नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मान देऊन त्यांचा गौरव करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांनी जय श्रीराम आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्याने उत्साह निर्माण झाला. या कार्यक्रमास नगरसेविका रेश्मा पाटील यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Recent Comments