Belagavi

माजी सैनिकाचा तहसीलदार कार्यालयात विषप्राशनाचा प्रयत्न

Share

देशसेवा केलेल्या माजी सैनिकाला हक्काच्या जमिनीसाठी गेल्या दोन दशकांपासून सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी चिंतामणी तहसीलदार कार्यालयात विषप्राशनाचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठा लाइट इन्फंट्रीचे माजी सैनिक शिवानंद रेड्डी यांनी कारगिल युद्धाच्या काळासह १७ वर्षांहून अधिक काळ देशसेवा केली. कर्तव्य बजावताना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवेतून मुक्त करण्यात आले. माजी सैनिकांच्या कोट्यातून शेतीसाठी जमीन मिळावी, यासाठी ते गेल्या दोन दशकांपासून चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील चिंतामणी तहसीलदार कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांत पाठपुरावा करत आहेत. मराठा लाइट इन्फंट्रीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही २०२१ मध्ये त्यांच्या अर्जाचा विचार करण्याची शिफारस केली होती. मात्र, स्थानिक महसूल अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आहे.

जमिनीच्या मागणीसाठी सातत्याने करावा लागलेला पाठपुरावा आणि कार्यालयीन दिरंगाईमुळे शिवानंद रेड्डी व्यथित झाले. अखेर तहसीलदार कार्यालयातच त्यांनी विषप्राशनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि सरकारने त्यांच्या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन माजी सैनिकांच्या कोट्यातील जमीन मंजुरीबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे.

Tags: