Belagavi

बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी बेळगावात भाजपचे आंदोलन

Share

वाल्मीकी विकास महामंडळातील भ्रष्टाचाराचा निषेध करत आणि मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज बेळगाव येथील राणी चन्नम्मा चौकात भाजपतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

भाजप कार्यकर्त्यांनी भव्य निषेध मोर्चा काढून राणी चेन्नम्मा चौकात एकत्र येत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून संताप व्यक्त केला. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची व झटापट झाली.

राज्यातील महाघोटाळा झाकण्यासाठी मंत्री बी. नागेंद्र यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात आल्याचा आरोप भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

या आंदोलन प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, महांतेश दस्तगौडर, अनिल बेनके यांच्यासह ५० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

माजी आमदार संजय पाटील बोलताना म्हणाले, राज्य सरकार सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचारात वाढ झाली असून, मंत्र्यांसाठी भ्रष्टाचार हा व्यवसाय बनला आहे. घोटाळ्यांची प्रकरणे लपवूनही सरकारचे गैरव्यवहार थांबलेले नाहीत. राज्यात शून्य भ्रष्टाचाराचे शासन देऊ म्हणणारे काँग्रेस सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडाले असून, आगामी काळात आम्ही सर्वजण सरकारविरोधात निरंतर लढा सुरू ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Tags: