Belagavi

बेळगावात जिल्हास्तरीय स्वातंत्र्यदिन उत्साहात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Share

बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर जिल्हास्तरीय ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी खुल्या वाहनातून संचलनाची पहाणी करून तिरंग्याला मानवंदना दिली.

ध्वजारोहण सोहळ्यानंतर पोलीस दल, अग्निशामक दल, होमगार्ड, एनसीसी, महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि विविध शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व आकर्षक संचलन (परेड) सादर केले.

आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पालकमंत्र्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा, क्रांतीवीर सांगोळ्ळी रायण्णा आणि ‘कर्नाटकचे सिंह’ गंगाधरराव देशपांडे यांच्या ऐतिहासिक बलिदानाचा गौरव केला. यासोबतच शहरात ५१५ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या उड्डाणपुलांच्या प्रकल्पांची कामे, ७५ कोटी रुपयांचे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि १० कोटी रुपयांच्या क्रीडांगण उभारणीची माहिती त्यांनी दिली.

या सोहळ्यास आमदार असिफ शेठ, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगारी, प्रादेशिक आयुक्त एम. जानकी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल शिंदे, उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील, पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: