बेळगाव मधील जिल्हा रुग्णालयात सर्व्हर डाऊन झाल्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात सर्व्हरची समस्या भेडसावत असून, गुरुवारी स्थिती अधिक बिकट झाली. रुग्णालयात ‘ई-हॉस्पिटल नेक्स्ट जेन’ हे नवीन सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर नोंदणी आणि बिलिंग यंत्रणेत तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे सकाळी OPD केसपेपर मिळवण्यासाठी रुग्णांना लांबलचक रांगेत उभे राहावे लागले. सिटी स्कॅन, रक्त तपासणी, शुगर टेस्ट, एक्स-रे आणि इको यांसारख्या चाचण्यांसाठी आधी बिल भरणे बंधनकारक आहे. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे बिलिंग प्रक्रिया विस्कळीत झाली. परिणामी रुग्णांना चार ते पाच तास वाट पाहावी लागली. बिल भरल्यानंतरच डॉक्टरांनी उपचार सुरू केले.

बेळगावसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून उपचारासाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयाच्या आवारात ताटकळत राहिले. वृद्ध, महिला आणि तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांचे हाल झाले. तासनतास वाट पाहताना रुग्णाच्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल रुग्णांच्या नातेवाइकांनी उपस्थित केला.

सर्व्हरची अडचण त्वरित सोडवून रुग्णालयाची सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



Recent Comments