Belagavi

बेळगावमध्ये २७० कोटी रुपयांच्या उड्डाणपुलासाठी माती परीक्षणाचे काम सुरू

Share

बेळगाव शहरात २७० कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी माती परीक्षणाचे काम सुरू झाले असून, ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २७० कोटी रुपये खर्चाच्या नव्या उड्डाणपुलासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून माती परीक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गावरून शहराला जोडणाऱ्या या उड्डाणपुलावर दोन ते तीन चढ-उताराचे रॅम्प असतील. शंकरानंद मार्ग (क्लब रोड) मार्गे हर्षा शोरूमपर्यंत उतरणारा मार्ग यात प्रस्तावित आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत निविदा अंतिम होऊन काम सुरू करण्याचे आदेश दिले जातील आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रत्यक्ष कामास प्रारंभ होईल.

उड्डाणपुलाच्या कामामुळे सुमारे २२० मोठी झाडे हटवण्याची वेळ आली होती. मात्र, पर्यावरण रक्षणाचा विचार करून ही झाडे न तोडता त्यांचे पुनरोपण करण्याचा निर्णय घेणात आला आहे. यासाठी महानगरपालिका आयुक्तांना पाच किलोमीटरच्या परिसरात सरकारी जागा, उद्याने व तलावांनजीक योग्य जागा शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने पुनरोपणाचे काम यशस्वी केले जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

Tags: