बेळगावमधील सह्याद्री नगरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ड्रेनेज तुंबल्याने गेल्या तीन दिवसांपासून रस्ता जलमय झाला आहे. यामुळे स्थानिक रहिवासी, वाहनधारक आणि शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

बेळगावमध्ये झालेल्या पावसामुळे सह्याद्री नगर परिसरातील मुख्य ड्रेनेज वाहिनी पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे परिसरातील पावसाचे पाणी वाहून न जाता रस्त्यावर साचले असून संपूर्ण रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे.


हे दूषित पाणी केवळ रस्त्यावरच साचलेले नसून परिसरातील घरे आणि दुकानांमध्येही शिरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून दुकानात आणि घरात पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान आणि त्रास सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यावसायिक भरत सुरेकर यांनी दिली. या समस्येमुळे परिसरातील व्यावसायिक कमालीचे चिंतेत आहेत.

महानगरपालिका कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ तात्पुरती मलमपट्टी करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची प्राथमिक पाहणी केली असली तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. या गंभीर समस्येवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.


Recent Comments