बेळगावमधील नागरिकांसाठी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या अत्याधुनिक आणि दर्जेदार वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध होत आहे. सदाशिव नगर येथील वननेस प्राईड इमारतीत नव्याने सुरू होत असलेल्या ‘कामाख्या डायग्नोस्टिक अँड रिसर्च लॅबोरेटरी’चे उद्घाटन २४ मे रोजी होणार असल्याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापनाने दिली आहे.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कामाख्या मेडटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत एम. कवीश्वर आणि विपणन संचालक अनिल पाटील यांनी संयुक्तपणे ही माहिती दिली. या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन २४ मे रोजी सकाळी ११:३० वाजता सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार आहे. कारंजीतर्फे कारंजीमठाचे म.नि.प्र. गुरुसिद्ध महास्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात हा सोहळा पार पडणार असून महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अभय पाटील, आमदार आसिफ सेठ, माजी आमदार संजय पाटील, माजी मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, डीसीपी नारायण भरमणी, बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी आणि डीएचओ डॉ. आय. पी. गडाद प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे श्रीकांत एम. कवीश्वर आणि अनिल पाटील यांनी जाहीर केले.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना व्यवस्थापनाने सांगितले की, या प्रयोगशाळेला राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले असून अत्यंत अचूक आणि दर्जेदार अहवाल देण्यास लॅब बाद्ध आहे. येथे सामान्य रक्त चाचण्या, ईसीजी, फुफ्फुसांच्या क्षमतेसाठीची पीएफटी, श्रवणदोष तपासणीसाठीची ऑडिओमेट्री यासह कारखान्यातील कर्मचाऱ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी आणि नोकरीपूर्व आरोग्य तपासणीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णालयात येऊ न शकणाऱ्या रुग्णांसाठी घरबसल्या रक्त नमुने संकलनाची सेवा देखील दिली जाईल, असे डॉ. प्रीती एस. मेदार आणि डॉ. बाबुराव गोगले यांनी सांगितले.


Recent Comments