बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. २१ एप्रिल रोजी होणारा हा सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी मिरवणूक मार्गावरील मूलभूत सुविधांचा आढावा महापौर आणि उपमहापौर लवकरच घेणार आहेत.

शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, साहित्यिक गुणवंत पाटील आणि प्रसाद मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चर्चेत मिरवणूक पाहण्यासाठी गॅलरी, पिण्याचे पाणी आणि स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय करण्याची मागणी करण्यात आली.
रात्रभर चालणाऱ्या या मिरवणुकीत शिवभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून उपहारगृहे सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी सूचनाही मांडण्यात आली. तसेच पोलीस, हेस्कॉम आणि आरोग्य विभागाच्या समन्वयासाठी आपत्कालीन मदत केंद्र कार्यान्वित करण्यावर या बैठकीत एकमत झाले.
महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी या सर्व मागण्यांची दखल घेत लवकरच प्रत्यक्ष मार्गाची पाहणी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला संतोष पेडणेकर, गिरीश धोंगडी, जयतीर्थ सौंदती, श्रीयेश नाकाडी आणि रमेश सोनटकी यांसह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments