बेळगावमधील शिवबसव नगर येथील नागनूर रुद्राक्षी मठात कार्यरत असलेल्या ‘स्टीम एच’ प्रशिक्षण आणि संशोधन प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. सिद्धरामेश्वर शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या सुशांत लक्कप्पा बंडिवड्डर आणि विठ्ठल मल्लिकार्जुन गदग या दोन विद्यार्थ्यांनी हे यश मिळवून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे.


बेंगळुरूमध्ये पार पडलेल्या ‘कोडवियर’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे त्यांची निवड आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे. ही स्पर्धा येत्या १६ आणि १७ मे रोजी इंडोनेशियातील जकार्ता येथे आयोजित करण्यात आली असून तिथे हे विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करतील.
या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक खेळाडूंप्रमाणे फुटबॉल खेळणारा ‘रोबोट सॉकर’ तयार केला आहे. विद्यार्थ्यांच्या या विशेष तांत्रिक कौशल्याबद्दल नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभु महास्वामीजी यांनी आनंद व्यक्त करत त्यांना आशीर्वाद दिले.
या यशात प्राचार्य व्ही. एस. होसमनी, समन्वयक हेमलता हिरेमठ आणि अधिव्याख्याते दयानंद मगदूम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे


Recent Comments