Chikkodi

बसवजय मृत्युंजय स्वामीजींवरील आरोपांचा पंचमसाली समाजाकडून तीव्र निषेध

Share

कुडलसंगम येथील बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्यावर करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप हे एक पद्धतशीर कारस्थान असून, त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे रायबाग येथील पंचमसाली समाज बांधवांनी म्हटले आहे.

रायबाग येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पंचमसाली समाजाचे नेते बोलत होते. पंचमसाली समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वामीजींनी पुकारलेला लढा काही हितशत्रूंना सहन होत नाही, त्यामुळेच एका महिलेचा वापर करून स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वावर चिखलफेक केली जात आहे. स्वामीजींचे चारित्र्य निष्कलंक असून, या खोट्या तक्रारीविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, त्यामुळे लवकरच सत्य समोर येईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

पंचमसाली समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला खीळ घालण्यासाठीच अशा प्रकारचे नीच कृत्य केले जात आहे. उच्च न्यायालयातून स्वामीजींना निश्चितच न्याय मिळेल आणि खोटी तक्रार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अशोक अंगडी आणि सुरेश होसपेठ यांनी केली.

यावेळी समाजाचे नेते अशोक अंगडी, सुरेश होसपेठ, शिवप्पा सवदी, आनंद डब्बनवर, प्रताप लभ्य, दरीअप्पा मुत्नाळ यांच्यासह इतर पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: