Belagavi

बेळगावमध्ये १४ एप्रिल रोजी मद्यविक्री बंद

Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेळगाव शहर आणि तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हे कडक आदेश जारी केले आहेत.

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी बेळगावमध्ये साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. पोलीस आयुक्त बोरासे भूषण गुलाबराव यांनी कर्नाटक अबकारी कायदा आणि पोलीस कायद्यांतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून संपूर्ण तालुक्यात ‘ड्राय डे’ घोषित केला आहे.

दिनांक १४/०४/२०२६ रोजी सकाळी ६:०० वाजल्यापासून ते मध्यरात्री १२:०० वाजेपर्यंत बेळगावमधील सर्व देशी-विदेशी मद्याची दुकाने, वाईन शॉप, बार आणि रेस्टॉरंट तसेच क्लब सक्तीने बंद ठेवावे लागणार आहेत. यासोबतच केएसबीसीएल (KSBCL) डेपोमधून होणारा मद्यपुरवठा देखील स्थगित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मद्यविक्री बंद असण्याच्या काळात मद्याची विक्री किंवा वाहतूक करताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त बोरासे भूषण गुलाबराव यांनी दिला आहे. सार्वजनिक शांतता आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

Tags: