Dharwad

काँग्रेस नेते इस्माईल तमटगार यांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक

Share

अंजुमन संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते इस्माईल तमटगार यांनी स्तंभलेखक चक्रवर्ती सुलिबेले यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याने हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद नेत्यांनी धारवाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या ७ एप्रिल रोजी धारवाडमधील सुभाष रोडवर लव्ह जिहाद विरोधात ‘जनाक्रोश आंदोलन’ करण्यात आले होते. या आंदोलनात चक्रवर्ती सुलिबेले यांनी मुस्लिम समुदायाचा अपमान केला आणि या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असा आरोप करत इस्माईल तमटगार यांनी यापूर्वी पोलिसांत तक्रार दिली होती. ही तक्रार देताना त्यांनी माध्यमांसमोर सुलिबेले यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले होते.

आता हीच बाब गंभीरपणे घेत हिंदू संघटनांनी इस्माईल तमटगार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. रस्त्यावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही रीतसर कायदेशीर परवानगी घेतली होती, मात्र इस्माईल तमटगार सार्वजनिकरीत्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे हिंदू संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे.

इस्माईल तमटगार यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा हुबळी-धारवाड या जुळ्या शहरांमध्ये व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवानंद सत्तीगेरी यांनी दिला आहे.

Tags: