विवाह ठरलेल्या विजापूरच्या २२ वर्षीय तरुणीने प्रियकराने खासगी फोटो उघड केल्याच्या अपमानास्पद धक्क्यातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सिंदगी तालुक्यातील बंदाळ गावातील जयश्री बिरादार (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे. जयश्रीचा विवाह येत्या २७ एप्रिल रोजी संपन्न होणार होता. मात्र, लग्नाच्या काही दिवस आधी श्रीशैल बडानूर नावाच्या तरुणाने जयश्रीसोबतचे काही वैयक्तिक फोटो वराच्या नातेवाईकांना पाठवले, ज्यामुळे ठरलेला विवाह रद्द करण्यात आला.
आपले खासगी फोटो उघड झाल्याने समाजात मानहानी झाल्याच्या भावनेतून जयश्रीने गावातील मदिना मशिदीजवळील विहिरीत उडी घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आपल्या मुलीच्या मृत्यूला श्रीशैल नावाचा तरुणच जबाबदार असल्याचा आरोप जयश्रीची आई सावित्री बिरादार यांनी केला आहे. संबंधित तरुणाला तातडीने अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या पोलिसांनी विहिरीतून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.


Recent Comments