Dharwad

योगेशगौडा यांच्या कुटुंबात मालमत्तेवरून वाद आणि हाणामारी

Share

धारवाड जिल्हा परिषद सदस्य योगेशगौडा हत्या प्रकरणाचा निकाल प्रलंबित असतानाच त्यांच्या कुटुंबात मालमत्तेवरून मोठे वादांग निर्माण झाले आहे. वाटणीच्या कारणावरून झालेल्या वादात हाणामारी झाल्याने हे प्रकरण आता पोलीस दप्तरी पोहोचले आहे.

धारवाड तालुक्यातील गोवनकोप्प गावातील शेतघरात मालमत्तेच्या वाटणीवरून योगेशगौडा यांचा भाऊ गुरुनाथ गौडा आणि त्यांच्या बहिणींमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. या वादादरम्यान गुरुनाथ गौडा आणि त्यांची पत्नी ज्योती गौडा यांनी लाकडी काठी व वायरने मारहाण केल्याचा आरोप बहिणींनी केला आहे.

या प्रकरणी जगदीश्वरी आणि अक्कमादेवी या बहिणींनी धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. गुरुनाथ गौडा यांनी आपल्याला शिवीगाळ करत मारहाण केली, अशी माहिती जगदीश्वरी यांनी दिली. या वादाचे व्हिडिओ आणि ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

धारवाड ग्रामीण पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुरुनाथ गौडा आणि ज्योती गौडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेशगौडा हत्या प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात असतानाच कुटुंबातील या अंतर्गत संघर्षामुळे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Tags: