बेळगावमधील हनुमान नगर येथे रविवारी सकाळी बिर्ला इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘बेला सुपर हिरो फन रन’ कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. चिमुकल्या मुलांनी विविध सुपर हिरो आणि प्रेरणादायी व्यक्तींच्या वेशभूषेत या धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.


या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांनी छोटा भीम, स्पायडरमॅन, बॅटमॅन यांसारख्या लोकप्रिय पात्रांसह भारतीय सैनिकांची वेशभूषा करून देशभक्तीचा संदेश दिला. या रंगीबेरंगी वेशभूषेमुळे संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली होती.

मैदानावर धावताना मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. चिमुरड्या पावलांनी एकमेकांशी स्पर्धा करताना मुलांचा आत्मविश्वास आणि आनंद पाहून उपस्थित प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले. या सोहळ्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
मुलांसाठी हा कार्यक्रम अतिशय आनंददायी ठरला असून अशा उपक्रमामुळे मुले आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.
मुलांना नुसते चांगले वागा असे सांगून उपयोग नाही, तर पालकांनी स्वतः तसे वागून त्यांच्यासमोर आदर्श ठेवला पाहिजे. आजची मुले उद्याच्या भारताचे भविष्य असून त्यांच्या नावावर वृक्षारोपण करून पुढील पिढीला चांगले पर्यावरण द्यावे, असे आवाहन नगरसेवक संदीप शिरगाळ यांनी केले.
निरोगी समाजासाठी आणि मुलांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. हा कार्यक्रम कर्नाटक पोलीस आणि भारतीय लष्कराला समर्पित असल्याचे जितेश मेणसे यांनी सांगितले.
मुलांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणि क्रीडा संस्कृती जोपासणे हा या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश होता. मुलांचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी असे कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतात, असे मत शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केले.
एकूणच ‘बेला सुपर हिरो फन रन’ कार्यक्रम मुलांचा उत्साह आणि पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वीपणे पार पडला.


Recent Comments