राज्यात सध्या मुख्यमंत्रिपद बदलण्यासाठी मोठा ‘घोडेबाजार’ सुरू असून काँग्रेस नेत्यांकडे प्रशासन चालवण्याची क्षमता उरलेली नाही, अशी खोचक टीका आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांनी केली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे राज्याचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विजापूर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बसणगौडा पाटील यत्नाळ यांनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. बागलकोट मध्ये शिवकुमार आणि दावणगेरे मध्ये सिद्धरामय्या यांना पराभूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसमध्ये सध्या योग्य पद्धतीने प्रशासन चालवण्याची परिस्थिती नाही. दिल्लीला जाऊन पैसे देऊन मंत्रीपद मिळवण्याची वेळ आली आहे, असे बसणगौडा पाटील यत्नाळ यांनी म्हटले.
सर्वच पक्षांतील अध्यक्ष वरिष्ठांना मॅनेज करण्यात मग्न आहेत. जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत आपणच अध्यक्ष राहणार अशा अविर्भावात हे नेते वागत आहेत. राज्यात सध्या मुख्यमंत्रिपद बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यवहार सुरू असल्याची टीका बसणगौडा पाटील यत्नाळ यांनी केली.
नवरसपूर उत्सवाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या उत्सवात कोणत्याही दुसऱ्या समुदायाचे नाव नसल्याने आमचा विरोध नाही. मात्र, आम्ही उत्सवाला यावे की नाही हे ठरवणारे एम. बी. पाटील कोण? मी या क्षेत्राचा आमदार आहे. सत्ता आणि अधिकार आहे म्हणून एम. बी. पाटील यांनी अशी भाषा वापरणे चुकीचे आहे, अशा शब्दांत बसणगौडा पाटील यत्नाळ यांनी नाराजी व्यक्त केली.


Recent Comments