Belagavi

बेळगावमध्ये नव्या हल्मिडी शिलालेखाची प्रतिकृती दाखल

Share

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हल्मिडी शिलालेखाची नवीन प्रतिकृती अखेर दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला हा शिलालेख आज शनिवारी सकाळी पुन्हा स्थापित करण्यात येणार असून प्रशासनाने याची तयारी पूर्ण केली आहे.

१ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्योत्सवाच्या निमित्ताने बेळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात हल्मिडी शिलालेखाची प्रतिकृती बसवण्यात आली होती. मात्र कार्यालयाच्या नूतनीकरण प्रक्रियेदरम्यान हा शिलालेख तोडण्यात आला होता, ज्याचे तीव्र पडसाद उमटले होते.

नूतनीकरणाच्या कामात शिलालेख नष्ट झाल्याचे समोर आल्यानंतर विविध संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. २३ मार्च रोजी यासंदर्भात राज्य मुख्य सचिवांकडे तक्रार करून निदर्शने करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने नवीन प्रतिकृती तयार करून घेण्याचे पाऊल उचलले.

हा नवा शिलालेख शुक्रवारी बेळगावमध्ये दाखल झाला असून आज त्याचे मूळ जागी संवर्धन केले जाणार आहे. पुढील आठवड्यात विविध संघटनांच्या वतीने या शिलालेखाला पवित्र जलाभिषेक आणि क्षीराभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिलालेख आणि त्याची बसवण्याची जागा दुर्लक्षित अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले होते. आता नवीन प्रतिकृती बसवल्यामुळे या वादावर पडदा पडणार असून ऐतिहासिक वारसा जपण्याकडे लक्ष दिले जात आहे.

Tags: