बेळगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कडक पाऊल उचलले असून गांजा विक्री आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पाच आरोपींना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण करणाऱ्या या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ५५ आणि ५६ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये हलगा येथील पिराजी यल्लाप्पा यसुची, टिळकवाडीतील यश गणेश दावले व आदित्य गणेश दावले, पार्वती नगरमधील संतोष गोविंद दिवटगी आणि मच्छे येथील रफिक महंमद रफिक इश्तियाक शेख यांचा समावेश आहे. यापैकी रफिक शेख याला तीन महिन्यांसाठी, तर उर्वरित चौघांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी बेळगाव जिल्ह्यातून बाहेर काढण्यात आले आहे. शहरातील गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी ही कारवाई केली असून यापुढेही अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.


Recent Comments