हुबळीमध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि अमली पदार्थांच्या तस्करीचा गंभीर आरोप करत हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अशोकनगर पोलीस ठाण्यासमोर मध्यरात्रीपर्यंत तीव्र निदर्शने केली. समीर बुदिहाळ नावाच्या तरुणाने हिंदु मुलींना जाळ्यात ओढल्याचा आरोप यावेेळी करण्यात आला.


राजनगर येथील समीर बुदिहाळ हा तरुण कारमध्ये गांजा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या संदर्भात एक व्हिडिओही समोर आला असून, तो गांजाचे पॅकेट उघडत असल्याचे त्यात दिसत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी समीरवर गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार, समीरच्या मोबाईलमध्ये अनेक हिंदु मुलींना अमली पदार्थ देतानाचे आणि त्यांचे शोषण करतानाचे व्हिडिओ सापडले आहेत. “हा केवळ गुन्हेगारी प्रकार नसून लव्ह जिहादचा कट आहे,” असा आरोप बजरंग दलाचे उत्तर कर्नाटक संयोजक शिवानंद सत्तिगेरी यांनी केला आहे.
आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोर बसून ‘श्रीराम’ नामाचा जप केला आणि आरोपीच्या तातडीच्या अटकेची मागणी केली. शहरात पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाई होत असतानाही अमली पदार्थांची विक्री कशी सुरू आहे, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
घटनेची गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त शिवानंद चेलुवादी यांनी आंदोलकांशी संवाद साधला. आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अखेर एफआयआरची प्रत मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


Recent Comments