Belagavi

बेळगावमधील शिवजयंती मिरवणुकीत डीजेवर बंदी

Share

बेळगावची जगप्रसिद्ध शिवजयंती मिरवणूक यावर्षी अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि उत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटावर बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे.

नगर पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत आयुक्त भूषण बोरसे यांनी मिरवणुकीसाठीची नियमावली जाहीर केली. मिरवणुकीत ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखाव्यांना प्राधान्य द्यावे, असे सांगतानाच डीजे लावून अश्लील डान्स करणाऱ्या किंवा इतर मंडळांना अडथळा निर्माण करणाऱ्यांना मुख्य मिरवणुकीत प्रवेश दिला जाणार नाही, असे भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.

मर्यादेपेक्षा जास्त आवाज असणारी साऊंड सिस्टीम जप्त केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची जबाबदारी मंडळांची असेल. शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या मागणीनुसार पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांचा समावेश असलेले ‘एक खिडकी मदत केंद्र’ स्थापन करण्यास आयुक्तांनी संमती दिली.

यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी मिरवणुकीसाठी बाहेरून येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी सन्मानाने वागण्याचे आवाहन केले. तसेच, ठराविक वेळेत मिरवणूक संपवून स्थानिक व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक वादाला थारा न देता एकजुटीने उत्सव साजरा करू, अशी ग्वाही रमाकांत कोंडुसकर आणि रणजित चव्हाण पाटील यांनी दिली.

या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रकाश मरगाळे यांच्यासह मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. यावर्षीचा उत्सव शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: