बेळगावमधील एका प्रसिद्ध उद्योजकाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून तब्बल १५ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येणार आहे.

या प्रकरणी हैदराबाद येथील श्रीपाद नाईक आणि शरद नाईक या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून उद्योजकाला घाबरवले आणि त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपये देशातील ६ वेगवेगळ्या राज्यांतील १० मुख्य खात्यांमध्ये वळवले होते.
तपासादरम्यान असे समोर आले की, लुटलेली ही रक्कम सुमारे ३९० उप-खात्यांद्वारे काढण्यात आली आहे. एका बनावट कंपनीच्या बँक खात्यात २ कोटी रुपये हस्तांतरित झाल्याचे पोलिसांना आढळले असून, त्यापैकी १ कोटी रुपये पोलिसांनी तात्काळ ‘फ्रीझ’ केले आहेत.
हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या शहरांतील बँक खात्यांचा वापर या मोठ्या फसवणुकीसाठी करण्यात आला होता. या गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेता, पुढील तपासासाठी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले जाणार असल्याचे समजते.
या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. या प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहारांचा बारकाईने तपास सुरू असल्याचे भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.


Recent Comments