चिक्कोडी तालुक्यातील बेळकुड गेट येथील लक्ष्मीनगरमध्ये लक्ष्मीदेवीच्या जत्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैल प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनात विविध भागांतील देखण्या आणि धिप्पाड बैलांना पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.


कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील विविध भागांतून ५० हून अधिक बैल या प्रदर्शनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना विविध रंग, झूल आणि दागिन्यांनी आकर्षकरीत्या सजवले होते. चिक्कोडीसह परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी या देखण्या जोड्या डोळ्यांत साठवून घेतल्या.

प्रदर्शनात दुधत्या दातांच्या चॅम्पियन बैलांपासून ते २, ४ आणि ६ दातांच्या जोड्यांपर्यंत विविध गट करण्यात आले होते. यामध्ये एकेरी आणि जोडी अशा दोन्ही प्रकारच्या बैलांचे प्रदर्शन पार पडले. उत्तम शरीरयष्टी आणि रुबाबदार चाल असणाऱ्या बैलांचे कौतुक करण्यात आले.
या स्पर्धेतील विजेत्या आणि सर्वोत्कृष्ट ठरलेल्या बैलांच्या मालकांना रोख रक्कम आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते आणि स्थानिक जनावरांच्या जातींचे जतन होते, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
यावेळी बसवराज पाश्चापूरे, प्रसाद साळस्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यात्रेनिमित्त आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीदेवी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. प्रदर्शनामुळे यात्रेतील उत्साहात अधिकच भर पडल्याचे बसवराज पाश्चापूरे यांनी सांगितले.


Recent Comments