मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी म्हैसूर येथे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मी माझ्या मुलाला वसुली करण्यासाठी राजकारणात आणलेले नाही,” अशा शब्दांत त्यांनी यतींद्र सिद्धरामय्या यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

सिद्धरामय्या यांच्या राजकीय इतिहासावर भाष्य करताना कुमारस्वामी म्हणाले की, सिद्धरामय्या जेव्हा पराभूत झाले होते, तेव्हा ते घरी येऊन रडले होते. “त्यावेळी जर बादली (बकेट) धरली असती, तर ती त्यांच्या अश्रूंनी भरली असती,” असा टोला त्यांनी लगावला. जेडीएसवर टीका करण्याची त्यांना नैतिक पात्रता नाही, असेही ते म्हणाले.
सिद्धरामय्या यांनी स्वतःला ‘अहिंदा’ (अल्पसंख्याक, मागास आणि दलित) नेते म्हणवून घेण्यापेक्षा काँग्रेस सोडून स्वतःच्या हिमतीवर ५ जागा निवडून आणून दाखवाव्यात, असे आव्हान कुमारस्वामी यांनी दिले. तसेच सिद्धरामय्या यांनी हायकमांडला घाबरवून मुख्यमंत्रीपद मिळवले असून, ते ही खुर्ची कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेसमधील अंतर्गत वादावर बोलताना कुमारस्वामींनी डी.के. शिवकुमार यांच्यावरही निशाणा साधला. “सिद्धरामय्या मुख्यमंत्री असल्याने आम्हांला नव्हे, तर त्यांच्याच पक्षातील नेत्यांना पोटशूळ उठला आहे,” असे ते म्हणाले. सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्रीपदाची संधी शोधणाऱ्यांकडूनच सिद्धरामय्या यांना त्रास दिला जात आहे, असे म्हणत त्यांनी शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर टीका केली.
काँग्रेसची अवस्था सध्या बिकट असून तामिळनाडू आणि बिहारमध्ये पक्षाची काय स्थिती आहे, हे सर्वांना माहीत आहे, असे कुमारस्वामी यांनी नमूद केले. सिद्धरामय्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार आणि वसुलीचे राजकारण शिगेला पोहोचले असून, दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या वागणुकीचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.


Recent Comments