भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवरून ‘भीम ज्योत’ आणण्यासाठी बेळगावमधील दलित नेते आज रवाना झाले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.


१४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी भीम ज्योत आणण्यासाठी निघालेल्या दलित नेत्यांचा आज सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी बेळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त उदयकुमार तळवार यांची जयंती उत्सवाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बेळगावमधील नेते नागपूरच्या दीक्षाभूमीवरून भीम ज्योत घेऊन येणार आहेत. ही ज्योत शहरात आल्यानंतर मुख्य जयंती सोहळ्याला प्रारंभ होईल. या सोहळ्यासाठी महानगरपालिकेने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असल्याचे उदयकुमार तळवार यांनी म्हटले आहे.
डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मल्लेश चौगुले आणि मल्लेश कुरंगी यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. उद्या महात्मा ज्योतिराव फुले यांची १५० वी जयंती साजरी केली जाणार असून, महाड सत्याग्रह आणि समता सैनिक दलाचा शताब्दी महोत्सवही पार पडणार आहे. नागपूरला गेलेले नेते १३ एप्रिलला भीम ज्योत घेऊन येतील आणि १४ एप्रिल रोजी सकाळी सम्राट अशोक चौकात तिचे भव्य स्वागत होईल, अशी माहिती मल्लेश चौगुले यांनी दिली.
यावेळी मल्लेश कुरंगी, बाबू पुजारी, महेश कांबळे, विनय कोलकार, नागेश कोलकार यांच्यासह अनेक दलित नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यंदाचा जयंती उत्सव शिस्तीत आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


Recent Comments