बागलकोट आणि दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांचा शंभर टक्के विजय होईल, असा विश्वास मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे. बेळगावमधील पत्रकार परिषदेत त्यांनी मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

शिग्गाव आणि बागलकोटमधील राजकीय परिस्थिती वेगळी असून प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यासानंतर तेथील नियोजनाबाबत स्पष्टता आली आहे. विजयाचे अंतर किती असेल हे प्रसारमाध्यमांनी ठरवावे, मात्र विजय आमचाच असेल, असे सतीश जारकीहोळी यांनी ठामपणे सांगितले.
भाजपवर निशाणा साधताना जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेस एखाद्या मतदारसंघात पराभूत झाली तरी भाजपचे लोक पुढील दोन वर्षे आम्हाला शांत बसू देणार नाहीत. ते स्वतःच मुख्यमंत्री किंवा मंत्री असल्यासारखे वावरू लागतात. काँग्रेसने विजय मिळवला तरच स्वतंत्रपणे आणि अडथळ्याविना प्रशासन चालवणे शक्य होईल. केवळ सभा घेऊन गर्दी जमवणे म्हणजे केवळ प्रदर्शन आहे; आम्ही मतदारांच्या दारापर्यंत जाऊन आमची कामे सांगून त्यांचे मन वळवण्यावर भर देत आहोत, अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी दिली.
दावणगेरे दक्षिणमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या नाराजीमुळे २० टक्के मते कमी होण्याची भीती असून, हे नुकसान भरून काढण्याची मोठी जबाबदारी मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्यावर आहे, असा इशारा जारकीहोळी यांनी दिला. माजी मंत्री मुरुगेश निराणी यांच्या विधानाचा समाचार घेताना, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींनी जात-धर्माच्या आधारावर बोलू नये, कारण त्याचे समाजावर विपरीत परिणाम होतात, असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.
मंत्रिमंडळात चार जागा रिक्त असून पक्षाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तार आणि संघटनात्मक बदलांचे निर्णय ४ एप्रिलपर्यंत न थांबवता लवकरात लवकर घेतल्यास कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. रमेश कत्ती यांचे विधान केवळ काही यूट्यूब चॅनेलवर दाखवण्यापुरते मर्यादित आहे, जनता त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाही. काही यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडियावरून भाजपची मोठी लाट असल्याचे भासवले जात आहे, मात्र निवडणूक लोकांमध्ये होते, मोबाईल स्क्रीनवर नाही. अशा प्रसिद्धीने मते बदलत नाहीत, उलट आम्ही यामुळे अधिक सतर्क होतो, अशा शब्दांत सतीश जारकीहोळी यांनी रमेश कत्ती यांच्या विधानांना प्रत्युत्तर दिले.
यावेळी वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनुमन्नवर, बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि जिल्हा गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments