Accident

​खानापूरमध्ये भीषण अपघात : कंटेनरच्या चाकाखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू

Share

​खानापूर तालुक्यातील घार्ली क्रॉसजवळ बुधवारी दुपारी भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला आहे.

याबाबत ​मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अळणावर-रामनगर महामार्गावरील घार्ली क्रॉसजवळ बुधवारी दुपारी हा अपघात घडला. उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोईडा तालुक्यातील मालंबा येथील रहिवासी बाळकृष्ण यशवंत चौधरी असे मृताचे नाव आहे. बाळकृष्ण चौधरी हे आपल्या लुना दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. या अपघातात बाळकृष्ण चौधरी खाली पडले आणि कंटेनरचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पीएसआय आर. एस. सपाटे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा नोंदवून फरार चालक आणि वाहनाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

Tags: