Belagavi

मनपा सभेत विविध समस्यांवरून अधिकाऱ्यांची महापौरांकडून कानउघडणी

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या प्रशासकीय बैठकीत विविध नागरी समस्यांवरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रलंबित कामे आणि ड्रेनेजच्या समस्येवरून आक्रमक पवित्रा घेतलेल्या सदस्यांची दखल घेत, महापौर प्रीती कामकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

बेळगाव महानगरपालिकेच्या परिषद सभागृहात महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रशासकीय बैठक पार पडली. यावेळी शहरातील प्रलंबित नागरी कामांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी त्यांच्या प्रभागातील ड्रेनेज समस्येचा प्रश्न उपस्थित केला. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येबाबत वारंवार तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे, असे रेश्मा भैरकदार यांनी नमूद केले. तसेच मन्नत कॉलनीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याची तक्रार नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी केली. यावर महापौर प्रीती कामकर यांनी अधिकाऱ्यांनी नगरसेवकांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ही समस्या त्वरित सोडवावी, असे आदेश दिले.

राष्ट्रीय महामार्गालगतचे खड्डे बुजवण्याची जबाबदारी प्राधिकरणाची असताना महानगरपालिकेने ही जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, तरीही अधिकारी या कामात गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंत नामनिर्देशित सदस्य दिनेश नाशिपुडी यांनी व्यक्त केली.

एल अँड टी कंपनीच्या कामामुळे सिडी वर्कचे नुकसान झाले असून, पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी उपस्थित केला. कलमठ रोडवर बाजारपेठेत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती जयतीर्थ सवदत्ती यांनी दिली.

जनतेकडून नागरी सुविधांबाबत तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. रस्ते आणि ड्रेनेजची कामे जनहित लक्षात घेऊन प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्षा लक्ष्मी राठोड यांनी केली.

नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी २०१६ मध्ये टाकण्यात आलेल्या भूमिगत केबल्सचा मुद्दा उपस्थित केला. १० वर्षांनंतरही या केबल्सना कनेक्शन न दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. ८० टक्के काम पूर्ण असताना केवळ २० टक्के काम रखडल्याने नागरिकांना त्रास होत आहे. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नगरसेवक रवी धोत्रे आणि संदीप जिरग्याळ यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शहरात वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास महापालिकेची हेल्पलाईन कार्यान्वित नसते, अशी तक्रार नगरसेविका वीणा विजापूरे यांनी केली. या मुद्द्याला नगरसेवक राजशेखर ढोणी यांनीही पाठिंबा दिला. हेल्पलाईन बंद असल्याने तक्रार कोणाकडे करायची आणि नागरिकांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न राजशेखर ढोणी यांनी विचारला. अखेर महापौरांनी सर्व प्रलंबित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश दिले.

Tags: