Chikkodi

भाजपचे खोटे बोलणे हेच त्यांचे दैवत : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

भाजपचे लोक खोटे बोलण्यात पटाईत असून निवडणूक आयोग कर्नाटकच्या महिलांवर अन्याय करत आहे, असा गंभीर आरोप मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला आहे. दोन मतदारसंघांतील काँग्रेसचा विजय निश्चित असून ही निवडणूक राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चिकोडी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. दावणगेरे मध्ये काँग्रेसच्या बाजूने लाट असून सरकारी गॅरंटी योजनांचा लाभ घराघरांत पोहोचला आहे. शामनूर शिवशंकरणप्पा यांनी केलेल्या कामांची पावती जनतेकडून मिळेल आणि बागलकोटमध्येही काँग्रेससाठी पोषक वातावरण असल्याने विजय आमचाच होईल, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.

निवडणूक असलेल्या दोन मतदारसंघांतच ‘गृहलक्ष्मी’ योजनेचा हप्ता जमा केल्याच्या भाजपच्या दाव्यावर त्यांनी कडाडून टीका केली. भाजपचे लोक खोटे बोलण्यात निष्णात आहेत, असे सांगत केवळ दोन मतदारसंघांत नव्हे तर राज्यातील १ कोटी २५ लाख महिलांच्या खात्यात नियमित हप्ता जमा केला आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. भाजपशासित राज्यांमध्ये गॅरंटी योजनांसाठी तीन महिन्यांचे पैसे आगाऊ देण्याची मुभा दिली जाते, मात्र येथे अडवणूक करून अन्याय केला जात आहे, असे त्यांनी नमूद केले.

जयमृत्युंजय स्वामीजींच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली. स्वामीजींबद्दल आदर व्यक्त करतानाच, या प्रकरणात एका महिलेचे नाव येत असल्याने संपूर्ण चौकशीअंतीच यावर भाष्य करणे योग्य ठरेल, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. याचबरोबर महिलांच्या संघटनासाठी चिकोडी आणि गोकाक परिसरामध्ये लवकरच ‘अक्का पडे’ची स्थापना केली जाईल, अशी माहिती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

Tags: