बेळगावमध्ये येऊ घातलेल्या शिवजयंती उत्सवाच्या तयारीसाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली.

मध्यवर्ती मंडळाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी आयुक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक भेट देऊन स्वागत केले. तीन दिवस चालणारा हा पारंपरिक उत्सव आणि मंगळवार २१ तारखेला निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या नियोजनावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेत संपवावी, दोन चित्ररथांमध्ये जास्त अंतर असू नये आणि ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी आवाजाची मर्यादा पाळावी, अशा सूचना पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिल्या. तसेच येत्या शुक्रवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता शहर आणि उपनगरातील सर्व मंडळांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक आयुक्तालयात बोलावली असल्याचे त्यांनी सांगितले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला अध्यक्ष अंकुश केसरकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सल्लागार मालोजी आष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्यवाह मदन बामणे आणि शिवराज पाटील उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आश्वासन यावेळी मंडळाच्या वतीने देण्यात आले.


Recent Comments