आजच्या मुलांना उच्च शिक्षणासोबतच उत्तम संस्कार देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जैन मुनी प. पू. मुनीराज आर्यशेखर विजयजी महाराज यांनी केले. बेळगाव येथील मिलेनियम गार्डनमध्ये जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित जागतिक नवकार दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते.


मुलांना केवळ शिक्षण देऊन चालणार नाही, तर संस्कारांची जोड देणे आवश्यक आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्रउभारणीत जैन समाजाचे मोठे योगदान असूनही इतिहासकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच समाजाने एकजुटीने अहिंसेच्या मार्गाने रक्षण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आमदार अभय पाटील म्हणाले की, ऋषीमुनींच्या शिकवणीनुसार मुलांना चांगले संस्कार दिल्यास एक सशक्त समाज घडण्यास मदत होईल. माजी आमदार संजय पाटील आणि ज्येष्ठ वकील रविराज पाटील यांनीही जितोच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना सांगितले की, या कार्यक्रमासाठी बेळगाव जिल्ह्यातून ३ लाख २४ हजार लोकांनी नावनोंदणी केली असून ४३० केंद्रांवर हा दिन साजरा केला जात आहे. हा एक प्रकारे विक्रमच आहे. दिल्लीत आयोजित मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन गृहमंत्री अमित शाह यांनी केले, तर बेळगावातील कार्यक्रमात सुमारे ४ हजार लोक सहभागी झाले होते.
यावेळी व्यासपीठावर जितो अपेक्स संचालक पुष्पक हनमन्नवर, कार्यक्रम समन्वयक प्रवीण समसुखा, युवा आणि महिला शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. विक्रम जैन यांनी सूत्रसंचालन केले तर महासचिव अभय आदिमानी यांनी आभार मानले.


Recent Comments