Belagavi

कोनवाळ गल्लीतील ब्रिटीशकालीन नाल्याच्या समस्येतून सुटका

Share

बेळगावमधील कोनवाळ गल्लीतील रहिवाशांसाठी दरवर्षी पावसाळा संकटाचा काळ असायचा. ब्रिटीशकालीन जुन्या नाल्यामुळे उद्भवणाऱ्या या गंभीर समस्येवर आमदार आसिफ सेठ यांनी उपाय शोधला असून, १ कोटी ८० लाख रुपये खर्चून या नाल्याच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू झाले आहे.

बेळगावमधील कोनवाळ गल्लीतील रहिवाशांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ब्रिटीशकालीन नाल्याच्या दुरुस्तीसाठी आमदार आसिफ सेठ यांनी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, आज या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

कोनवाळ गल्लीतील हा नाला २५२ मीटर लांब असून त्याचे बांधकाम १८९० मध्ये करण्यात आले होते. सध्या हा नाला अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचला आहे. महापालिकेच्या सभेत नगरसेवकांनी या समस्येकडे लक्ष वेधले असता, महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याचे समोर आले होते. “विकासाच्या बाबतीत कोणताही भेदभाव न करता जनहितासाठी मी माझ्या आमदार निधीतून हे काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता आणि आज त्याचे काम सुरू होत आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार आसिफ सेठ यांनी दिली.

“कोनवाळ गल्लीतील नाल्याचा प्रश्न दर पावसाळ्यात गंभीर होत असे. आम्ही हा मुद्दा महापालिकेच्या सभेत मांडल्यानंतर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी विकासाचे आश्वासन दिले होते. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे काम सुरू केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत,” असे मत सत्ताधारी पक्षनेते आणि नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी व्यक्त केले.

“पावसाळ्यात नाल्याचे घाण पाणी आमच्या घरात शिरत असल्याने आमचे खूप हाल होत असत. आता आमदारांनी या कामाला सुरुवात केल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे,” अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.

याप्रसंगी स्थानिक नागरिक, महानगरपालिका अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: