Vijayapura

पंचमसाली समाजाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी वादाच्या भोवऱ्यात

Share

पंचमसाली समाजाच्या ‘२ए’ आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे कूडलसंगम पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी सध्या एका मोठ्या वादात सापडले आहेत. स्वामीजींना मारहाण करून पैशांसाठी धमकावण्यात आल्याची तक्रार त्यांच्या शिष्याने दिली असून, दुसरीकडे एका महिलेने स्वामीजींवर गंभीर आरोप केले आहेत.

कूडलसंगम पीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्यावर हल्ला करून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याची तक्रार त्यांचे शिष्य संतोष मंजन्नी यांनी विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. ११ फेब्रुवारी रोजी विजापूरमधील कग्गोड जवळ स्वामीजींच्या कारला त्रिवेणी नावाच्या महिलेसह अन्य काहींनी अडवून गोंधळ घातला होता. या प्रकरणामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त होत असून विजापूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेनंतर संबंधित महिलेने सोशल मीडियावरून बदनामी सुरू केली असून राजकुमार नावाच्या व्यक्तीमार्फत ३ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप संतोष मंजन्नी यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे विजयानंद काशप्पनवर यांचा हात असल्याचा गंभीर आरोप संतोष मंजन्नी यांनी केला आहे.

याच दरम्यान, संबंधित महिलेने स्वामीजींवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. इतके दिवस गप्प बसलेल्या महिलेने स्वामीजींनी तक्रार केल्यानंतरच आरोप का केले, असा प्रश्न संतोष मंजन्नी यांनी उपस्थित केला आहे. हे केवळ पैशांसाठी केलेले ब्लॅकमेलिंग असून घटनेवेळी आपण स्वतः कारमध्ये उपस्थित होतो, असे संतोष मंजन्नी यांनी म्हटले.

विजापूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी जाळे विणले असून एक पथक बेंगळुरूमध्ये तळ ठोकून आहे. पोलिसांनी त्रिवेणी, पृथ्वीगौडा, यशवंत ऊर्फ मंजुनाथ आणि वीरेश या चार आरोपींना चौकशीसाठी नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. स्वामीजींनी तक्रार दाखल केल्यानंतर ६ तारखेला संबंधित महिलेने बेंगळुरूमध्ये स्वामीजींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सध्या या प्रकरणामुळे संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली असून याला राजकीय वळण लागले आहे. सोशल मीडियावरही स्वामीजींच्या बाजूने आणि विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीस तपासात आरोपींची अटक आणि चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया संतोष मंजन्नी यांनी व्यक्त केली.

Tags: