बागलकोट आणि दावणगेरे या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असून, या निकालानंतर भाजपमधील अंतर्गत संघर्ष वाढून अनेक नेत्यांचे राजकीय भविष्य संपणार असल्याचे सूचक विधान विजापूरचे पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी केले आहे.

बागलकोट आणि दावणगेरे येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर विजापूरमध्ये एम. बी. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांमुळे विशेषतः महिलांचा मोठा पाठिंबा मिळत असून, काँग्रेस उमेदवार १० ते १५ हजार मतांच्या फरकाने आणि एकूण २५ हजार मतांच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास एम. बी. पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर जोरदार टीका केली. या निवडणुकीनंतर विजयेंद्र यांना अध्यक्षपदावरून हटवले जाईल आणि त्यांचे राजकीय भविष्य संकटात सापडेल, असे भाकीत एम. बी. पाटील यांनी वर्तवले. भाजपकडून एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून काँग्रेसवर पैसे वाटपाचे आरोप केले जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना, विजयेंद्र यांच्यासाठी अशा गोष्टी नवीन नाहीत, असे एम. बी. पाटील यांनी म्हटले. तसेच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि विजयेंद्र यांच्यावर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण त्यांनीच द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांच्या संदर्भात बोलताना एम. बी. पाटील यांनी भाजपच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले. यत्नाळ यांना प्रचारात उतरवणे ही भाजपची हतबलता असून, त्यांनी कितीही प्रचार केला तरी विजय मिळणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीनंतर यत्नाळ आणि विजयेंद्र या दोघांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल, अशी टीका एम. बी. पाटील यांनी केली. अखेर, पोटनिवडणुकीचा निकाल पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूनेच लागेल, असा दावा एम. बी. पाटील यांनी केला.


Recent Comments