Belagavi

शहापूरमध्ये शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी व्यापक बैठक

Share

बेळगावमधील ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ, शहापूरची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १९ एप्रिल रोजी होणारी शिवजयंती आणि २१ एप्रिल रोजी निघणारी चित्ररथ मिरवणूक पारंपरिक उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहापूर येथील साईगणेश सोसायटीच्या सभागृहात आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, बेळगावच्या शिवजयंतीला १०७ वर्षांचा इतिहास असून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतून हजारो शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात पूजन करण्यात येईल, तर २१ एप्रिल रोजी सायंकाळी बॅ. नाथ पै चौक येथून चित्ररथ मिरवणुकीचा प्रारंभ होईल. शहापूर, अनगोळ आणि वडगाव भागातून येणाऱ्या चित्ररथांचे महामंडळाकडून स्वागत केले जाणार असल्याचे नेताजी जाधव यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगळे आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंकुश केसरकर यांचा शहापूर महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रकाश मरगळे यांनी सांगितले की, समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी विश्वासाने पार पाडेन. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या घडामोडींवर आमचे लक्ष असून, शिवजयंती सोहळ्यानंतर मध्यवर्ती समितीच्या बैठकीत सीमा लढ्याची पुढील दिशा ठरवली जाईल.

मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी तरुण कार्यकर्त्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही दिली. सर्वांच्या सहकार्याने १०७ वर्षांची परंपरा लाभलेली शिवजयंती भव्य स्वरूपात साजरी करूया, असे आवाहन अंकुश केसरकर यांनी केले. या बैठकीत प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, महादेव पाटील, पी. जी. घाडी, माजी उपमहापौर संजय शिंदे आणि माजी नगरसेवक राजू बिर्जे यांनी आपले विचार मांडले. यावेळी शहापूरमधील विविध मंडळांचे पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर प्रशांत भातकांडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Tags: